जिल्ह्यात रब्बी क्षेत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न 

‘आत्मा’ अंतर्गत प्रात्यक्षिके; 16 हेक्टर जमीन लागवडीखाली 

रत्नागिरी:- खरीपनंतर पडीक राहणारी जमिन लागवडीखाली आणणे, रब्बी हंगामात घरच्या घरी भाजीचे उत्पादन घेणे आणि त्यातून उत्पन्नाचे साधन मिळवणे या उद्देशाने विकेल ते पिकेल योजनेंतर्गत ‘आत्मा’मधून जिल्ह्यात 658 प्रात्यक्षिके घेण्यात आली. शेतकर्‍यांना चार हजार रुपयांची विविध प्रकारची बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन दिली असून सुमारे 16 हेक्टर जमीन लागवडीखाली आली. यासाठी शासनाकडून सुमारे 26 लाख 32 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र अत्यंत कमी आहे. पावसाळ्यात भात लागवडीनंतर दुबार पिके घेतली जात नाहीत. थंडीच्या काळात होणारी भाजीपाला लागवड ही अत्यंत कमी असते. त्याला रत्नागिरी जिल्ह्यात वायंगणी म्हटले जाते. गेल्या दहा वर्षात बचत गटाच्या माध्यमातून भाजीपाला क्षेत्र वाढू लागले आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा आत्मा अंतर्गत विशेष प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अनुदानार मिश्र भाजीपाला, कलिंगड, भेंडीची बियाणे उपलब्ध करुन दिली आहेत. मिश्र भाजीपाला किटमध्ये दुधी, गवार, काकडी, मुळा, घेवडा, पालक, कोथिंबीर यांचा समावेश आहे. एका शेतकर्‍याला एका एकरचे लक्ष दिलेले होते. या योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 16.45 हेक्टर जमिनी रब्बीच्या लागवडीखाली आली आहे. एका प्रात्यक्षिकासाठी चार हजार रुपयांचे बियाणे दिले गेले आहे. यासाठी जिल्ह्याला सुमारे 18 लाख 32 हजार रुपये निधी प्राप्त झाले आहेत. भात पिकानंतर बहूतांशी अन्य पिके घेणारा वर्ग कमी आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यातून येथे भाजीपाला आणून विकला जातो. याच ठिकाणी असलेल्या जमिनीत भाजीपाला लागवड करण्याच्या हेतूने ही योजना आखण्यात आली आहे. रब्बीची पेरणी झाली असून काही ठिकाणी भाजी रुजूनही आली आहे. पुढील पंधरा दिवसात त्यातून उत्पादन मिळण्यास सुरवात होणार आहे.