जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणीसाठी जागेची निश्चिती

ना. सामंत यांचे विशेष प्रयत्न

रत्नागिरी:- सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरीत देखील सुसज्ज मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी कामांना गती आली आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंत सर्व तांत्रिक बाबींना मंजुरी मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. असे झाल्यास २०२१-२२ या वर्षासाठी मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया शक्य आहेत. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार असून हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या देखील प्रगत होण्यासाठी हातभार लागणार आहे.

रत्नागिरीत मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरु व्हावे, त्या संदर्भातील तांत्रिक बाबींना मंजुरी जलद गतीने मिळावी म्हणून ना. उदय सामंतांनी एक स्वतंत्र पथक कार्यरत केले आहे. या पथकात तज्ञ अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचे प्रमुख डॉ. विजय शेगोकर आपल्या सहकाऱ्यांसह रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दोन दिवसातच त्यांनी मेडिकल कॉलेज साठी जागेची निवड करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात डीन साठी एक स्वतंत्र कार्यालय सुरु केले आहे. डॉ. विजय शेगोकर यांनी महारष्ट्रात सुमारे ७ ते ८ मेडिकल कॉलेज उभारणीत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

कॉलेज सुरु करण्यासाठी सुमारे २५ एकर जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात रत्नागिरीत विविध जागांची पाहणी करण्यात आली. यानुसार कापडगाव येथील ७.५ एकर व दांडेआडम येथील १५ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्या संदर्भाचे पत्र तहसीलदारांनी सबंधित कार्यालयाला दिले आहे. या कॉलेज साठी जिल्हा रुग्णालय देखील ३ वर्षासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.