जिल्ह्यात मुसळधार कायम! पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी:-  जिल्ह्यात गेले २ दिवस धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण, संगमेश्वर, गुहागरमध्ये अनेक भागांत पाणी घुसल्याने पुन्हा महापूर येणार की काय? या भीतीने येथील रहिवासी धास्तावले आहेत. अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कोळकेवाडी धरणातून होणारी वीजनिर्मिती थांबवण्यात आली आहे.

चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरीत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. दापोलीत सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. मंगळवारी दापोलीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने हाहाकार उडाला.

पावसाचा जोर कायम असल्याने चिपळूणमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील वेलदूर-नवानगर-धोपावे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठ, पालशेत बाजारपेठ मंगळवारी पाण्याखाली गेली होती. संगमेश्वरमधील माखजन, आरवली आणि संगमेश्वर बाजारपेठेतही पाणी घुसले होते. राजापुरात मंगळवारी रात्री अर्जुना नदीच्या पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आल्याने पुराची भीती व्यक्त करण्यात येत होती.

जिल्ह्यात कालपर्यंत सरासरी १५६ मिमी, तर एकूण १४०४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचे पाणी भरायला सुरुवात झाली मात्र काही वेळातच ते ओसरले. संगमेश्वर तालुक्यात डिंगणी, फुणगूस, माखजन, आरवली येथे पाणी भरले होते. तेथील ६ घरांना धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे; मात्र कुठे पाणी भरल्याची घटना नाही. समुद्राला प्रचंड उधाण होते. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना सतर्कच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीवर मात्र काहीसा परिणाम झाला. संध्याकाळी पाऊस कमी झाल्यानंतर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले.

दापोली तालुक्यातील जालगाव येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे जालगाव समर्थनगर, लष्करवाडी, चैतन्यनगर, भाटकर हॉस्पिटल व ब्राह्मणवाडी गणपती मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांची पाचावर धारण बसली. काळकाई कोंड येथे प्रकाश साळवी यांच्या घरासमोर पाणी शिरले होते. रूपनगर मनीष जगदीश कदम यांच्या घरासमोर पाणी शिरले.

काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत मंडणगड १३२, दापोली ३१५.४०, खेड १५१.५०, गुहागर १५८.८०, चिपळूण २०९, संगमेश्वर १६२.७०, रत्नागिरी १०४.९०, राजापूर ६२.६०, लांजा १०८ (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत) पावसाची नोंद झाली आहे.