रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली आणि अर्जुना या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात 156.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत धुवाँधार पाऊस पडला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली आणि अर्जुना या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. वरची पेठ भागाकडे जाणार रस्ता पाण्याखाली गेल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची धावपळ सुरू आहे. शहरातील गणेश घाट आठवडा बाजाराकडील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पुराचा धोका ओळखून व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवला आहे. तसेच शीळ, गोठाणे दोनीवडेकडे जाणारा मार्ग अर्जुना नदीच्या पुराखाली गेला होता. त्यामुळे राजापूर शहराला पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. गेल्या 24 जिल्ह्यात 728.40 मिमी पाऊस पडला आहे. रत्नागिरी 117 मिमी, संगमेश्वर 109.20 मिमी, लांजा 104 मिमी, राजापूर 85.80 मिमी, चिपळूण 71.50 मिमी, गुहागर 71.30 मिमी, मंडणगड 63.90 मिमी, दापोली 53.90 मिमी आणि खेडमध्ये 51.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.