रत्नागिरी:- राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात आदेशाचे उल्लंघन केले गेले तर त्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन लवकर होत असल्यामुळे या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून तसेच पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. या आदेशानुसार, परवानाधारक बिगर- यंत्रचालित नौकांना मासेमारीसाठी मुभा दिली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते तसेच या कालावधीत
खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. ही बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे; तसेच ३१ जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी कोणालाही जाता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करू नये, अशी सूचना जिल्ह्यातील ८५ मच्छीमार सहकारी संस्थांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.
मासळी नसल्याने नौका किनाऱ्यावरच
दरम्यान, यंदा मासळी मिळत नसल्यामुळे अनेक मच्छीमारांनी १० मे रोजीच नौका माघारी घेतल्या आहेत. नौकांसह जाळ्यांची दुरुस्ती करून ठेवली आहे. नौकांवरील खलाशी माघारी परतले आहेत. त्यामुळे बंदरांवरील गजबज थोडी कमी होऊ लागली आहे.
मच्छीमारी बंदीबाबत राज्य शासनाकडून काढलेले आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मच्छीमारी संस्थांना पत्राद्वारे बंदी कालावधीची माहिती दिली गेली आहे तसेच पावसाळ्यात बेकायदेशीर मासेमारी होऊ नये यासाठी बंदरांवर करडी नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभय शिंदे-इनामदार यांनी दिली.









