जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी

रत्नागिरी:- हवामान खात्याचा अंदाजानुसार बुधवारी (ता. 8) सायंकाळी रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून पावसाचा जोर वाढत रहावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हलका वारा वाहू लागला आणि पावसाला आरंभ झाला. सुमारे एक तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरीही वातावरण तसे नव्हते. सायंकाळी पाऊस सुरु झाल्यामुळे कार्यालयातून घरी परतणार्‍यांची तारांबळ उडाली होती. छत्र्या, रेनकोट नसल्यामुळे काहींनी भिजतच दुचाकीवरुन घर गाठले. रत्नागिरीसह संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी भात पिकाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.