जिल्ह्यात माता, बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:-जिल्ह्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोविडच्या साथीत संसर्गजन्य (नॉन कम्यूनीकेबल डिसीज) लोकांसाठी विशेष पथक तयार करुन त्याद्वारे वैद्यकिय अधिकार्‍यांचे मार्गदर्शन रुग्णांना दिले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केला.

जिल्हा प्रशिक्षण पथक येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यशाळा व कोविड योध्दा सन्मान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, डॉ. गुजलवार, डॉ. दिनेश सुतार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दर आठवडयाला आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन केले.

तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांनी कोरोना कालावधीमध्ये कशा पध्दतीने समस्या उत्पन्न होत होत्या व त्या समस्यांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 साथीवर मात केली, याबाबत सर्वांनी वरिष्ठांवर कौतुकाचा वर्षाव केला. कोकणातील शिमगा उत्सवासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात कोविड साथ नियंत्रणासाठी दररोज 20 स्वॅबचे नमुने घेण्याच्या सुचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे शिमगोत्सवासाठी बाहेरुन येणार्‍या लोकांची तपासणी करण्याची सूचना केल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. डॉ. सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.