जिल्ह्यात महिनाभर पुरेल इतकाच औषधसाठा

रत्नागिरी:- राज्यभरात क्षयरोगाच्या औषधांसाठी तुठवडा असल्याची स्थिती समोर येत आहे. सुमारे महिनाभर पुरेल इतकाच औषधसाठा जिल्हास्तरावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. हा औषधसाठा संपल्यास महिनाभरानंतर जिल्ह्यात उपचाराखालील 859 रुग्ण व गंभीर (एमडीआर) 134 क्षयरुग्णांसमोर औषधांचा पश्न उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

क्षयरुग्णांच्या औषधांच्या पुरवठ्यासमोर केंद्रीय क्षयरोग विभागाने 18 मार्चला सर्व राज्य क्षयरोग अधिकाऱयांना पत्र पाठविले. क्षयरोगाचा विळखा कमी करण्यासाठी दरवर्षी 24 मार्च हा ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळण्यात येतो. केंद्र शासनाने 2025 ला क्षयरोग निर्मूलन करण्याचेही ध्येय ठेवलेले आहे. क्षयरोगाची औषधे केंद्राकडून राज्याला येतात. मात्र, येथे राज्य क्षयरोग विभागाच्या काही औषध केंद्रांना औषधांचा पुरवठा नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य आरोग्य विभागाने क्षयरोगाच्या औषधांच्या खरेदीसाठी निविदाही काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
क्षयरोग म्हणजेच भट्युबरक्युलॉसिस (टीबी) या आजाराचे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर रुग्ण आढळून येतात. टीबी म्हटले की आपल्यासमोर खोकणारी व्यक्ती नजरेसमोर येते. छातीचा टीबी बहुतेकांना माहिती आहे. मात्र त्यासोबत मेंदू, पाठीचा कणा, मानेत येणारी गाठ, डोळा या ठिकाणीसुद्धा टीबीचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या भुंकीतून, खोकल्याच्या थेंबातून हा रोग पसरण्याची दाट शक्यता असते. हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जिवाणूमुळे आजार होतो. या आजारात उपचार वेळेत न घेतल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. थुकी आणि रक्त चाचणी, एक्स रे आणि सीटी स्कॅनच्या माध्यमातून त्याचे निदान करणे शक्य आहे. सरकारी रुग्णालयात या आजारावरील चाचण्या आणि औषधे मोफत मिळतात.
या आजारातून वाचण्यासाठी नागरिकांनी आपली. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह, फुप्फुसाचे आजार, एचआयव्हीसारख्या सहव्याधी तसेच मद्यपान, धूम्रपान करणाऱया रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. उत्तम आहार, नियमित व्यायाम केल्याने या आजारापासून दूर राहणे शक्य आहे.