रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी एसटीच्या १२० फेऱ्या सोडण्यात आल्या. यामधून सुमारे १२०० हून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. मात्र शनिवारप्रमाणे आजही मंडणगड आणि रत्नागिरी आगार १०० टक्के बंद आहेत. परंतु टीआरपी व विभागीय कार्यशाळेतील ६६ कर्मचारी कामावर हजर झाल्याने गाड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोमवारी आणखी काही कर्मचारी कामावर हजर झाल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गुहागर, खेड, दापोली, चिपळूण, राजापूर लांजा, देवरुखमधून गाड्या सोडण्यात आल्या. मात्र रत्नागिरी, मंडणगड आगार बंद आहेत. जिल्ह्यात आज सुमारे ४२५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सोमवारी ही संख्या वाढणार आहे. तसेच वाहतूकही सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १९३ जणांची सेवासमाप्त करण्यात आली आहे. यापूर्वी २४९ जणांना नोटीस देण्यात आली होती. त्यातील आता फक्त ५६ जणांची सेवा समाप्त करण्यात आलेली नाही. काम बंद आंदोलन अशाच प्रकारे चालू राहिल्यास त्यांच्यावरही सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येतील. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता आणि वेतनवाढीचा प्रस्ताव धुडकावून विलिनीकरणाच्या प्रस्तावावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची टांगती तलवार आहे. आज सायंकाळअखेर निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १२८ वर पोहोचली आहे.
दरम्यान, दोन दिवसांत म्हणजे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र एसटी सुरू नसल्याने पालक संभ्रमावस्थेत आहेत. सोमवारी ५० टक्के वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाला आहे.