जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर; नेवरेत कच्चा रस्ता गेला वाहून

मागील चोवीस तासात जिल्ह्यात २५.३२ च्या सरासरीने २२७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यात किरकोळ हजेरी लावलेल्या पावसाचा जोर बुधवारी मध्यरात्री पासून काहीसा वाढला आहे. बुधवारी मध्यरात्री अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील नेवी येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या शेजारी गावातील ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुराच्या पाण्यात हा कच्चा रस्ता वाहून गेला. यामुळे गावचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे विहिरींच्या पाण्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईसुद्धा काही प्रमाणात दूर झाली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्याने भाताच्या पेरण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. रोपे उगवून आल्यानंतर २० ते २२ दिवसाच्या फरकानंतर रोपे काढून लागवड केली जाते. त्यामुळे सध्याचे वातावरण रोपे उगवून येण्यासाठी अनुकूल आहे.

गतवर्षी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याने पेरण्यांना ही विलंब झाला होता. मात्र, यावर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक ही कोलमडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते.