जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात सापडले ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे 18 बाधित रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे नवे १८ बाधित सापडले आहेत. हे सर्व बाधित ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरू झाली आहे, असा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केला. खबरदारी म्हणून कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क अनिवार्य आहे. मास्क वापरल्यास ८० टक्के कोरोनावर मात करता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून सावरून पूर्वपदावर येत असताना चौथ्या लाटेने डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. कोकणाचा मुंबईशी थेट संबंध येत असल्याने जिल्ह्यातही त्याचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने कोरोना नियम पाळण्यासंदर्भात आवाहन केले असले तरी ते नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ठराविक नागरिकच मास्क वापरत आहेत. बहुतेक नागरिकांना विनामास्क फिरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढताना दिसत आहे. आरोग्य विभाग दक्ष झाला असून चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. चाचण्या वाढवल्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यात २४५ कोरोना चाचण्या केल्या. त्यापैकी १८ जणांचा अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५८४ झाली आहे. सहाजणांनी आज कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेले रुग्ण ८२ हजार ११ असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६.९६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाचाही मृत्यू झाला नसला तरी आजवरच्या मृतांची संख्या २ हजार ५३४ असून मृत्यूदर ३ टक्के आहे. आज दिवसभरात १८ नवीन बाधित सापडले असून आठवडाभरातील बाधितांचा हा आकडा आता ५० वर गेला आहे.खबरदारी म्हणून कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.