गणपती गेले दिवाळी आली तरीही तटपुंजा पेन्शनची प्रतीक्षाच
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसात शेकडो निर्णय घेणाऱ्या सरकारने राज्यभरातील सर्वसामान्य दिव्यांग तसेच दिव्यांग कर्मचारी यांच्या बाबतीत सावत्र भूमिका घेतल्याने दिव्यांगांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. माहे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन महिन्याची पेन्शन अद्यापही जमा न झाल्याने गणपती सणाप्रमाणेच दिवाळीमध्येही पेन्शनची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद व मुंबई येथे दिव्यांग पेन्शन वाढीसाठी महामोर्चा निघूनही प्रशासनाने महत्त्वाच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.
केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, सहाय्यक उपकरणांसाठी मागील सहा वर्षांपासून थकित असलेले अनुदान व अनुशेष व पदोन्नती या मागण्यासाठी आझाद मैदानावर राज्यभरातून जमलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची साधी दखल ही न घेतली गेल्याने दिव्यांग कर्मचारी प्रचंड संतापलेला आहे. 7 लाख मतदार असलेला दिव्यांग यावेळी एकजुटीने आपला संताप व्यक्त करणारा असल्याचे दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.
संघर्ष हा अटळ आहे तो दिव्यांगांच्या पाचवीलाच पुजला आहे सर्वसामान्य दिव्यांग व दिव्यांग कर्मचारी एकत्र येऊन आपल्यावरील अन्यायाविरोधात पेटून उठला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदान येथे जमलेल्या हजारो दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला त्याची किंमत निश्चित मोजावी लागेल. सर्व जिल्ह्यांमधून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य दिव्यांग व दिव्यांग कर्मचारी यांना एकत्रित करण्यासाठी कटिबद्ध आहे.
–दिगंबर घाडगे पाटील, संस्थापक अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य