जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 1 हजार 88 पदे रिक्त

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण 7363 मंजूर पदापैकी 1088 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर परिणाम होताना दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागातील मराठी माध्यमामध्ये शिक्षकाची 6869 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 5903 शिक्षक कार्यरत असून 184 पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमामध्ये 494 मंजूर पदांपैकी 392 शिक्षक कार्यरत आहेत. एकूण 104 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण मंजूर 7363 पदांपैकी 6295 शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात तब्बल 1088 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून शिक्षकांची भरती होणे गरजेचे असल्याची मागणी पालकवर्ग आणि शिक्षकामधून होत आहे.

सेवानिवृत्तांमुळे रिक्त पदांची संख्या वाढतेय

गेली काही वर्षे प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची भरती झालेली नाही. दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. सेवानिवृत्त शिक्षकामुळे रिक्त पदाचा आकडा दर महिन्याला वाढत आहे. ही रिक्त पदांची संख्या वाढतच राहिली तर भविष्यात प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणे अवघड होणार आहे.