जिल्ह्यात पावसाने 45 दिवसात गाठली 50 टक्के सरासरी

रत्नागिरी:- मोसमी पाऊस कोकणात प्रवेशित व्हायला विलंब झाला असला तरी अनंत अडथळ्याअंती केवळ 45 दिवसातच  कोकणात पावसाने 50 टक्के सरासरी गाठली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मि.मी. पाऊस होतो. त्या तुलनेत  45 दिवसात पावसाने 55 टक्के मजल मारली आहे. 102 पाऊस दिनांपैकी 45 दिवसात जवळपास निम्मा पाऊस झाला आहे. आगामी चार दिवस कोकणात पावसाचे सातत्य राहणार असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शनीवारी पावसाने सकाळी काही काळ उघडीप दिली. मात्र अन्य काही भागात पावसानने उसंत घेत हलक्या सरींनी हजेरी लावली.  

शनीवारी जिल्ह्यात 46.78 मि.मी.च्या सरासरीने  421 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात 65 मि.मी. दापोली 81, खेड तालुक्यात 82, गुहागर 14, चिपळूण 31, संगमेश्वर 41, रत्नागिरी 5, लांजा 54,  राजापूर 48 मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी काही भागत पावसाने उसंत घेतली. रत्नागिरी तालुक्यात सकाळी पावसाने उघडीप दिली. मात्र दुपारी जोरदार सरींची हजेरी लावली होती.  मंडणगड, खेड आणि दापोली तालुक्यात पावसाचे सातत्य होते. मात्र त्यामध्ये जोर नव्हता.  खेड तालुक्यात गेले अनेक दिवस जगबुडीच्या पात्राने पात्र सोडून वाहायला सुरवात केली होती. मात्र, शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याने जगबुडीतील जलपातळी  नियंत्रणाखाली येण्यास मदत झाली. तरीही प्रशासनाने आगामी पावसाच्या संभाव्य सातत्यावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मोसमी पावसाचा प्रवास प्रारंभी अडखळत झाला होता. जुलैचा पहिला पंधरावडा जवळपास कोरडा गेल्यानंतर दुसर्‍या पंधरावड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण केली होती. रत्नागिरी तालुक्यातही चांदेराई येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पावासाचा जोर कमी झाला.  मात्र, पाऊस दिनांच्या 45 दिवसाताच पावसाने जिल्ह्यात 55 टक्के सरासरी पुर्ण केली आहे. शासकीय निर्देशानुसार  रत्नागिरी जिल्ह्यात 3246 मि.मी. पावसाची सरासरी आहे. त्या तुलनेत जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात जिल्ह्यात 1722. 56 मि.मी. पाऊस  झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने 15 हजार 503 मि.मी. एकूण पाऊस झाला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात झाला आहे.तर सर्वात कमी पाऊस रत्नागिरी  तालुक्यात नोंदविला आहे. जिल्ह्यात पावासने आतापर्यंत 53 टक्के वाटचाल पूर्ण केली असून उर्वरित 75 दिवसांत पावसाची केवळ 47 टक्के सरासरी वाटचाल शिल्लक राहिली आहे.