जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू: ना. सामंत

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी येथे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पावसाने झालेल्या नुकसानीपासून ते शेतकरी कर्जमाफी, मनसे-भाजप जवळीक, आणि मोखाडा घटनेपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती आपण घेतली असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले. या संदर्भात प्रशासन आपले काम चोख बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर बोलताना, “इतर मंत्री महोदय काय बोलले यापेक्षा मी काल जाऊन जे शासनाच्या वतीने पत्र दिले, ते महत्त्वाचे आहे,” असे सामंत म्हणाले. शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि तिचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कुणाला कर्जमाफी द्यायची, हे समितीचा अहवाल ठरवेल असेही सामंत यांनी सांगितले.

‘सामना’ वृत्तपत्राबद्दल विचारले असता, “मी ‘सामना’चा वाचक नाही,” असे सामंत यांनी सांगितले. मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीवर बोलताना ते म्हणाले की, मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे आणि राज ठाकरे स्वाभिमानी आहेत, त्यांचा एक वेगळा विचार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज्या काही अटी घातल्या, त्या राज ठाकरे मान्य करतील असे त्यांना वाटत नाही. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली दिशा स्पष्ट केली आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.

संजय राठोड यांच्या प्रश्नावर बोलणे सामंत यांनी टाळले. “संजय राठोड, त्यांचे पीए, त्यांचे अधिकारी यावर आपण नेहमीच बोलत आलो आहोत. आज मी योजनेची पाहणी करायला आलो आहे,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

भरत गोगावले यांच्या विधानावर बोलताना सामंत म्हणाले की, “माझ्या सकट कुठल्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असे वाटत नाही. आमचे प्रमुख नेते यावर बोलू शकतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही.” भरत गोगावले यांना ही माहिती कुठून मिळाली, याची मी विचारणा करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोखाडा घटनेसंदर्भात आपण स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून, यासंदर्भात ते पुढच्या आठवड्यात बैठक लावतील, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.