जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; दोन दिवस पावसाचा जोर राहणार 

रत्नागिरी:-जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळनंतर संततधार पावसाचा आरंभ झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोर कायम राहील; मात्र त्यानंतर तीन दिवसात जोर कमी होईल अशी शक्यता होईल. जिल्ह्यात भात रोपांच्या वाढीला समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

जिल्ह्यात चोविस तासात सरासरी 43.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 75.80, दापोली  12.10, खेड 77.80, गुहागर 30.10, चिपळूण 39.80, संगमेश्वर 55.90, रत्नागिरी 23.90, राजापूर 20, लांजा 54.60 पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत उन-पावसाचा खेळ सुरु होता. श्रावण महिन्याप्रमाणेच वातावरण होते. सायंकाळी अचानक ढग भरुन आले आणि पावसाला सुरवात झाली. वेगवान वार्‍यांसह मुसळधार पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता. शेतीला पुरक असा पाऊस पडत असल्याने शेतकरी समाधानी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या पुढील पाच दिवसातील अंदाजानुसार 19 जुनला 60 मिमी, 20 जुनला 51 मिमी, 21 ला 39 मिमी, 22 जुनला 22 तर 23 जुनला 27 मिमी पाऊस पडेल. वार्‍याचा वेगही ताशी 8 ते 14 किलोमीटर राहील. त्यानुसार दोन दिवस वारे, पाऊस अशी स्थिती कायम राहील; मात्र त्यानंतर जोर कमी होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे जिल्ह्यात दापोली पाजपंढरी, शिरसोली, शिरसोश्वर, शिरसाडी, गिम्हवणेतील घरांचे मिळून एक लाखाचे तर माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात कळकवणे- आकणे- तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली. तेथील वाहतूक आकळे-कादवड-तिवरे या मार्गे वळविण्यात आली आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: 24 हजार रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पडवे, अडूर येथील घराचे पावसामुळे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात कुचांबे, पांगरी, पुर्ये देवळे बौध्दवाडी येथील घरांचे तर तुळसणीतील विहीरीचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.