जिल्ह्यात पावसाचा जोर; जगबुडी, काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रत्नागिरी:- मुसळधार पावसाने सोमवारी (ता. ४) चांगलेच झोडपून काढले. जगबुडी, काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खेड शहराच्या हद्दीवर पुराचे पाणी पोचले होते. चांदेराई बाजारपेठेतील व्यावसायीकांमध्येही चलबिचल सुरु होती. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण, सावर्डे परिसरात पाणी साचून वाहतूकीचा खोळंबा झाला. तर लांजा-केळवली येथे पुलावरुन पाणी जात होते. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी २०.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड २७, दापोली ३७, खेड १७, गुहागर २०, चिपळूण १४, संगमेश्‍वर २१, रत्नागिरी ३, लांजा ३५, राजापूर १४ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत सरासरी ८०१ मिमी पाऊस झाला असून गतवर्षी याच कालावधीत सरासरी  १२२७ मिमी नोंद झाली होती. गेले चार दिवस अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. रविवारी दिवसभर कडकडीत उन पडले होते. त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. परंतु सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला आरंभ झाला. दिवसभर पडणार्‍या पावसाने जगबुडी, काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली. बावनदी, वाशिष्ठीचेही पाणी वाढले होते.जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड नगरपरिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  पावसाचा जोर कायम राहील्यास पाणी शहरात शिरण्याची भिती व्यक्त केली जात होती.

काजळीच्या पाण्यामुळे दाभोळे-लांजा मार्गावरील केळवली येथील पुलावर पाणी फार मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण तालुक्याला बसला. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्यामुळे तेथे पाणी साचून राहिल्याने नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. नागरिकांचा ये-जा करण्याचा मार्गच बंद पडल होता. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनधारकांचा प्रचंड त्रस्त सहन करावा लागाला. डेरवण येथे झाड पडून रस्ता बंद झाला होता. ते झाड काढण्यासाठी सायंकाळी प्रयत्न सुरु होते. सावर्डेमध्येही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण झाला. सायंकाळच्या सुमारास काजळी नदीचे पाणी वाढल्याने चांदेराई बाजारपेठेतील व्यावसायीकांमध्ये चलबिचल सुरु झाली होती. यावर्षी प्रशासनाकडून नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. ते काम अपूर्ण राहिले होते. काढलेला गाळ किनार्‍यावरच ठेवल्यामुळे तो पाण्याबरोबर वाहून गेला. केलेल्या कामाचे लाखो रुपये वाया जाणार आहेत.