जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; शेतीच्या कामांना वेग

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून, रविवारी आणि सोमवारीही जिल्ह्यात पावसाने सातत्य राखले. काही भगात पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. जिल्ह्याच्या इतर भागांतही सरीवर सरी सुरू असून दमदार पावसामुळे भातरोप लावणीच्या कामांना गती आली आहे. सोमवार (3 जुलै) पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात दि. 24 जूनला मान्सूनचे पुनरागमन झाले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे. शनिवारपासून जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार तर काही भागात मध्यम सरी कोसळल्या. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या काही तालुक्यांना पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले तर काही भागात पावसाच्या अधुनमधून जोरदार तर कधी मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. काही भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. पावसामध्ये सातत्य असल्यामुळे शेतकर्‍यांनी लावणीला सुरुवात केली आहे. शेतमळ्यांमध्ये शेतकरी पुनर्लागवड करीत असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.

या वर्षी मोसमी पावसाच्या आगमनानंतर एक दोन दिवसच पाऊस झाला. त्यानंतर हलक्या सरी पडत होत्या. मात्र, पावसामुळे सातत्याचा अभाव दिसून आला. लहरी पावसाचा मोठा परिणाम या वर्षीच्या खरिपावर झाला आहे. यावेळी भातरोपवाटिका उशिराने तयार करण्यात आल्या. त्यामुळे लावणी कामेही लांबणार आहेत. मात्र, सध्या पावसातील सातत्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून नदीनाल्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच आता हवामान विभागाने सोमवारपासून 5 जुलैपर्यंत तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.