रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधुनमधून श्रावणधारा बरसू लागल्या आहेत. मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी किनारी परिसरातील 78 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. चार दिवस पुराचे पाणी शेतामध्ये साचून राहिल्यामुळे हे नुकसान झाले आहे.
जुन, जुलै या दोन्ही महिन्यांची सरासरी मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शक्य झाले. जिल्ह्यात आजपर्यंत 2106 मिलीमिटर सरासरी पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत चारशे मिमि कमी पाऊस झाला. जुन महिन्यात पाचशे मिमि कमी पाऊस होता. जुलै महिन्यात ही कमी भरून काढली असून अधिक नोंद झाली आहे. जिल्ह्यात मॉन्सुनच्या चार महीन्यात सरासरी 3300 मिमि पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात उर्वरित 30 टक्के पाऊस पडावयास हवा. समाधानकारक पावसामुळे भातलावण्यांची कामे अखेरच्या टप्प्यात आली आहेत.
मागील आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बावनदी, अर्जुना, कोदवली, काजळी या नद्यांना आलेला पूरामुळे किनारी भागातील परिसर जलमय झाला होता. किनारी भागातील भातशेतीला पुराचा फटका बसला. चार दिवसांहून अधिक काळ पाणी शेतामध्ये साचून राहिल्याने लावलेली भात रोप कुजली असून काही ठिकाणी गाळ साचून राहिला आहे. त्यामध्ये पुन्हा लावणी करणेच अशक्य आहे. पावसाने सलग तिसर्या दिवशी विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरला असून परिस्थितीही नियंत्रणात आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास आरंभ केला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 77.66 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात रत्नागिरी 25.35 हेक्टर, खेड 14.90, लांजा 0.03, राजापूर 0.58, मंडणगड 4.47, चिपळूण 30.93, दापोली 0.09 हेक्टरचा समावेश आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून सलग तिन दिवस सुर्यदर्शन झाले आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 19.08 मिमि पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 27.50, दापोली 13.70, खेड 21.20, गुहागर 14.20, चिपळूण 16, संगमेश्वर 24.20, रत्नागिरी 13.80, लांजा 19, राजापूर 21.80 मिमि नोंद आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला असल्यामुळे पुढील आठवडाभर सरींचा पाऊस पडत राहिल असा अंदाज आहे.