रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. रविवारी (ता. 20) दिवसा कडकडीत ऊन पडले होते. चिपळूणात कादवड येथे वाडा पडल्याने एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाले.
रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 33.67 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत 303 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 73.80, दापोली 10.30, खेड 69.70, गुहागर 20.20, चिपळूण 24.70, संगमेश्वर 28.80, रत्नागिरी 17.50, राजापूर 32.60, लांजा 25.40 मिमी नोंद झाली. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात गुहागर, संगमेश्वर, राजापूर, चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पडत होत्या. वेगवान वार्यामुळे झाडे पडून घरा, गोठ्यांच्या नुकसानीचेही प्रकार घडले आहेत. हवामान विभागाने पाऊस कमी होत जाईल असा अंदाज वर्तविला होता. रत्नागिरी तालुक्यात अधुनमधून पाऊस झाला. थांबून थांबून पाऊस पडत असल्यामुळे शेतीची कामे वेगाने सुरु आहेत. भाताची रोपे चांगल्या पध्दतीने रुजून येत आहेत. येत्या आठ दिवसात लावणीच्या कामांना सुरवात होईल. त्यासाठी शेतामध्ये उकळणीची कामे सुरु आहेत.
पावसामुळे दापोली आतगांव येथे रजना रमेश कदम यांच्या गोठयाचे पावसामुळे अंशत: 44 हजार रुपयांचे, दाभोळ बेंडलवाडी येथे रचना चंद्रकात राणे यांच्या घराची सरंक्षण भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात कासारावाडी येथे सिताराम लक्ष्मण घाणेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले. कादवड येथे बबन लक्ष्मण निकम (वय वर्षे 65) यांचा वाडा कोसळला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून माधुरी गणेश निकम (वय वर्षे 10), आरती संजय पवार (वय वर्षे 15), मयुर लवेश जाधव (वय वर्षे 7) हे तिघे जखमी झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर येथे अनिल दत्तात्रय लाड यांच्या 1 बैलाला वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला.