जिल्ह्यात आढळले ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे पाच रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ज्ञांनी सांगितले होते. 

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.

जिल्ह्यात पाच जणांमध्ये डेल्टा प्लस विषाणू आढळल्याने ही गावे बंद करण्यात आली आहेत आणि कंटेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सने वर्तवली होती. “डेल्टा प्लस” प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.