जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या 1 हजार 611 शाळा पुन्हा गजबजल्या

रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांपैकी 5 ते 8 वीचे वर्ग मंगळवारपासून (ता. 27) प्रत्यक्ष भरण्यास सुरवात झाली. जिल्ह्यात 2,172 पैकी 1,611 शाळा सुरु झाल्या. 72 हजार 401 पैकी 34 हजार 264 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. शाळा सुरु होण्याचे प्रमाण 80 टक्के असून पन्नास टक्के विद्यार्थी कोरोनातही शाळेत दाखल झाले आहेत.

कोरोना प्रदुर्भावामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यामुळे बुधवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र अत्यावश्यक केले आहे. पहील्या टप्प्यात नोव्हेंबर 2020 मध्ये 9 ते 12 वी चे वर्ग सुरु झाले.त्याला पन्नास टक्केच प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागांपेक्षा शहरातील पालकांची विद्यार्थी पाठविण्यास मानसिकता नाही. तीच परिस्थिती 5 ते 8 वीच्या वर्गांसाठी राहील असे चित्र आहे. आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रित असून लसीकरणही सुरु आहे. त्यामुळे भिती हळूहळू कमी होत आहे. ते प्रत्यक्ष उपस्थितीमधून दिसते.

जिल्ह्यात 2,172 शाळा असून 72 हजार 401 विद्यार्थी संख्या आहे. मोठ्या पटाच्या शाळा सुरु करण्यात अनेकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. येत्या काही दिवसात शंभर टक्के शाळांमध्ये उपस्थित राहील असे चित्र आहे. अधिक पट असल्यामुळे शाळांनी वेळापत्रक निश्‍चित केले आहे. पहिल्या दिवशी मुली, दुसर्‍या दिवशी मुले असे नियोजन केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 असे अध्यापनाची वेळ ठेवण्यात आली आहे. शाळात 5 हजार 394 शिक्षक आणि 1,227 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शाळा सुरु करण्यापुर्वी 5 हजार 042 शिक्षकांनी कोरोना चाचणी पूर्ण केली. त्यात 21 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले.