जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने भातशेती वर करपा, कीड रोग पडण्याची भीती

रत्नागिरी:- जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील भात पिकावर करपा अथाव कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थितीची पाहणी आता ड्रोनद्वारे करण्याची तायरी कृषी विभागाने केली आहे.
पीकस्थिती पाहणी करताना आवश्यक असल्यास फवारणीही ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्‍हाडेे यांनी दिली. अलिकडेच पावस येथे एका प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे पीकस्थिती आणि फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याला ऑक्टोबरच्या मध्यावर परतीच्या पावसाने झोडपले. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पडलेल्या पावसाने ऐन कापणीच्या तयारीत असलेल्या भात पिकावर  रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. अनेक तालुक्यात भातशेतीची हानी होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व माउली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती, तसेच रत्नागिरी कृषी विभाग यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील पीकस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

ड्रोनद्वारे पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास फवारणीही करण्यात येणार आहे. अलिकडेच पावस येथे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ड्रोनद्वारे फवारणी कशी करावी, त्याचे फायदे याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाली असल्याने आता पीकस्थितीची पाहणीही ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे.