रत्नागिरी:- जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसत असून विविध घटनांमध्ये तीनजणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. घरे, गोठे, सरकारी व खासगी मालमत्तांचे सुमारे 91 लाख 53 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 125 कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे पिंपळाचे झाड कोसळून तिघे जखमी झाले होते. या तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातील लक्ष्मीकांत वेदरे यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 6 रोजी सायंकाळी घडली होती. प्रतिक मयेकर आणि गुरुनाथ भाटकर हे जखमी झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे कापशी नदीत बुडून शनिवारी सायंकाळी 7 वा. श्रावणी सुधीर मोहिते या 15 वर्षीय युवतीचा झाला आहे. तिसरा बळी दापोली तालुक्यात पालगड कोंडी दीच्या पात्रात युवराज यशवंत कोळुगडे यांचा गेला आहे.
जिल्ह्यात 37 कच्चा घरांचे अंशत: व पूर्णत: असे सुमारे 16 लाख 32 हजार 545 रुपयांचे नुकसान झाले तर पक्क्या घरांमध्ये अंशत: व पूर्णत: असे 76 घरांचे 26 लाख 81 हजार 316 रुपयांचे नुकसान झाले आहे. अंशत: व पूर्णत: असे 29 गोठ्यांचे सुमारे 13 लाखाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 19 सार्वजनिक मालमत्तांचे 32 लाख 57 रुपयांचे तर खासगी 7 मालमत्तांचे 2 लाख 95 हजाराचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पुरामध्ये 59 कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले असून 198 व्यक्तींचा समावेश आहे तर दरडीमुळे 66 कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात 141 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.