रत्नागिरी:-पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार असून याचबरोबरच जिल्ह्यात २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे ढोल वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता शहराबरोबरच ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील तब्बल २७३ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ४ ते ६ जून दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करायचा आहे. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ७ जून रोजी आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करायचे आहे. त्यानंतर ७ ते १० जूनपर्यर्त आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ग्रामस्थांना मुदत देण्यात आली आहे. १५ जून रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. त्यानंतर १७ रोजी प्रांताधिकार्यांनी जाहीर केलेले अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. जिल्ह्यात मंडणगडमध्ये १६, दापोली ३४, खेड १७, गुहागर २६, चिपळूण ३३, संगमेश्वर ३९, रत्नागिरी ३३, लांजा ३४ व राजापूर तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत होणार आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे.