रत्नागिरी:-जिल्ह्यात चोविस तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येने मोठी उसळी घेतली आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 431 आणि त्यापूर्वीचे 123 असे एकूण 554 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत तब्बल 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी आलेल्या अहवालांनी जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा काही तासांपुरताच ठरला आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात बाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात 554 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 61 हजार 576 इतकी झाली आहे.
मागील काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच आहे. सोमवारी 5 हजार 398 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात 331 जण बाधित सापडले होते. मात्र मंगळवारी 4 हजार 725 चाचण्या करण्यात आल्या असून यात 431 तर त्यापूर्वीचे 123 असे एकूण 554 जण कोरोना बाधित सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 554 रुग्णांमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 9.12 टक्के इतका झाला आहे.
जिल्ह्यात 24 तासात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 13, चिपळूण 6, संगमेश्वर 7, दापोली 4, खेड 1 आणि राजापूर तालुक्यात 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 33 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर वाढून 2.88 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 771 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.