पाली, पाचल किंवा रायपाटण यापैकी दोन तालुके येणार अस्तित्वात
रत्नागिरी:- जिल्ह्यात पाली आणि पाचल किंवा रायपाटण हे दोन नवे तालुके करण्याच्या दृष्टीने पुन्हा हालचाली सुरु करण्यात आल्या असून, परिपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी तहसीलदार व प्रांताधिकार्यांना दिल्या आहेत.
राजापूर तालुक्याच्या सह्याद्री लगतच्या पूर्व पट्ट्याच्या गावांचे विभाजन करुन कामकाजाच्या दृष्टीने नवीन रायपाटण तालुक्याची निर्मिती करण्याची मागणी मागील आठ वर्षांपासून लालफितीच्या कारभारात अडकली आहे. आ. राजन साळवी यांनी 2015मध्ये प्रथम मागणी करीत त्याचे निवेदन कोकण आयुक्तांकडे दिले होते. हे मागणीचे पत्र 2016मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यानंतर ग्रामपंचायत रायपाटण, पंचायत समिती उपसभापती यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांनीही याबाबत मागणी केली होती. त्यानंतर रायपाटण तालुक्याच्या निर्मितीबाबत 2020मध्ये तहसीलदारांनी अहवाल मागविला होता. यावेळी लांजा तालुक्यातील विलवडे, शिरवली, व्हेळ, वाघ्रणगाव आणि रिंगणे या गावांनी विरोध करीत, गावांचा समावेश रायपाटण तालुक्यात न करण्याचा ठराव केला होता तर आरगाव, कोंडगे व कुरंग गावांनी रायपाटण तालुक्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत कोणताच ठराव केला नव्हता.
दरम्यान, रायपाटणजवळच असणार्या पाचल गाव हे पंचक्रोशीचे गाव असल्याने याठिकाणी पूर्व विभागाच्या दृष्टीने तालुक्याचे ठिकाण व्हावे व पाचल तालुका व्हावा म्हणून कृती समिती व ग्रामपंचायतीने विविध स्तरांवर मागणी केली. राजापूरचे विभाजन करताना पाचल तालुक्याची मुख्यालयासह निर्मिती व्हावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुन्हा एकदा अभिप्राय मागवण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्याचे मुख्यालय पाचल किंवा रायपाटण असावे याबाबत परिसरातील ग्रामपंचायतींचे लेखी ठराव घेण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत स्पष्ट व परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकार्यांनी राजापूर उपविभागीय अधिकार्यांना दोन महिन्यांपूर्वी दिले आहेत.