रत्नागिरी:-हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचे आगमन झाले नसले तरीही दिवसभर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाराही 34 अंशापर्यंत स्थिरावल्यामुळे हवेत उष्मा जाणवत होता. पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट आणि वादळी वार्यासह हलका व मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा मोसमी पाऊस गेल्यानंतर सलग प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली. रविवारी (ता. 1) रात्रीच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस झाला. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटांनी रत्नागिरीकरांना धडकी भरली होती. कुवारबावपासून पुढे हातखंबा, पाली परिसरात हलका पाऊस झाला. त्यामुळे गार वारेही वाहू लागले होते. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. त्याला पुरक अशी स्थिती होती. मंगळवारी दुपारपर्यंत रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर हळूहळू वातावरण निवळले, त्यामुळे आंबा बागायतदारांनी निःश्वास सोडला. पावसामुळे आंबा काढणी थांबण्याची शक्यता वर्तविली जात होती. सायंकाळी हलका गार वाराही सुटलेला होता.
काढणीस तयार आंबा फळांवर पाऊसामुळे काढणीपश्चात रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तयार फळांची काढणी पाऊसापूर्वी करून घ्यावी असे आवाहन पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कोकण कृषी विभागाने शेतकर्यांसाठी केले आहे. वाळविण्यासाठी ठेवलेली काजू बी, कडधान्य पक्व शेंगा सुरक्षित ठिकाणी ठेवा. वादळी वार्याची शक्यता असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिके, पपई, केळी पिकाला आधार द्यावा असे पत्रकात नमुद केले आहे.