जिल्ह्यात दहा लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण 

रत्नागिरी:- कोरोना लसीकरण मोहीमेंतर्गत पहिला आणि दुसरा डोस मिळून दहा लाख लसीकरणाचा टप्पा जिल्ह्याने पार केला आहे. १८ वर्षांवरील १० लाख ८१ हजार ९०० जणांच्या लसीकरणाचे जिल्ह्याचे उद्दीष्ट असून त्यात पहिला डोस ६ लाख ९८ हजार ९९५ आणि दुसरा डोस ३ लाख ३ हजार ९२२ जणांनी घेतला.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित सापडण्याचा टक्का अधिक होता. दुसर्‍या लाटेमध्ये पहिल्या पाच मध्ये जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर राहीला होता. सध्या हे प्रमाण कमी होऊ लागले आहे. वाढत्या बाधितांमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून काम सुरु झाले होते. त्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातही शिबिरांचे आयोजन सुरु होते. सुरवातीला लसीच्या मात्रा कमी मिळत होत्या; मात्र सध्या मात्रा आणि नागरिक यांचा मेळ बसू लागला आहे. आरोग्य विभागाने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १० लाख ८१ हजार ९०० लस लागणार असल्याचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार जानेवारी २०२१ पासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढला. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचाही वाटा मोलाचा होता. त्यांनी स्वतः अधिकच्या लस उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत आले आहे.

सोमवारपर्यंत (ता. २७) १० लाख लसीच्या मात्रांचे वितरण पूर्ण झाले. या लसीकरणात कोविशिल्डचा पहिला डोस ५ लाख ७७ हज़ार ४६३ तर दुसरा डोस २ लाख १९ हजार ९७७ जणांनी घेतला. कोवॅक्सिनचा पहिला डोस १ लाख २१ हजार ५३२ तर दुसरा डोस ८३ हजार ९४८ जणांनी घेतला. एकुण लक्षांकापैकी ६ लाख ९८ हजार ९९५ जणांनी म्हणजेच ६४.६१ टक्के जणांनी पहिला डोस आणि ३ लाख ३ हजार ९२२ जणांनी म्हणजेच २८.०९ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.