जिल्ह्यात तीन हजार बंधाऱ्यात अडले पाणी

रत्नागिरी:- यंदा पडलेल्या कमी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या टंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद स्तरावरून ‘मिशन बंधारे’ मोहिमेला दिवाळीपूर्वीच गती देण्यात आली. आतापर्यंत लोकसहभागातून ग्रामपंचायतस्तरावर 3 हजार 120 बंधारे गावपातळीवर बांधण्यात आले आहे.

जिल्ह्यात येत्या वर्षी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावरून दिवाळीपूर्वीच ‘मिशन बंधारे’ मोहीम ग्रामपातळीवर गतीमान करण्यात आलेली होती. दरवर्षी दिवाळीनंतर गतीमान केली जाणारी ‘मिशन बंधारे’ मोहिम यावेळेस दसर्‍यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. या 2023-24 मध्ये जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना प्रती 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्यात 8 हजार 460 कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मागील 2022-23 मध्ये हे उद्दिष्ट फक्त 3033 बंधारे बांधून गाठण्यात आले होते.
या हंगामात जिल्ह्यामध्ये पर्जन्यमानाने सरासरी देखील गाठलेली नसल्यामुळे प्रशासनस्तरावरून आतापासूनच पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केलेले आहे. ग्रामपातळीवर तेथील नदी-नाल्यांवर बंधारे उभारण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तेथील ग्रामस्थांचा सहभाग घेतला जात आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतींने किमान 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे 1200 हून अधिक बंधार्‍यांची ग्रामस्तरावर उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत एकूण बंधार्‍यांची झालेली उभारणी पाहता ही संख्या 3 हजार 120 इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये कच्चे बंधारे 1652, वनराई बंधारे 638, विजय बंधारे 830 इतके बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात दापोली, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यात या मोहिमेला आघाडी मिळाली.