प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असताना विशेष खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या दक्षता सूचना: बाहेर पडणे टाळा: विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास घराबाहेर जाणे टाळावे.विद्युत उपकरणे बंद ठेवा: विजा चमकत असताना संगणक, टीव्ही यांसारखी विद्युत उपकरणे बंद करून स्त्रोतांपासून (प्लग्ज) वेगळी करावीत. फोनचा वापर टाळा: दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी (मोबाइल) चा वापर टाळावा. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या: नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाहेर असल्यास पक्के घर किंवा इमारतीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून आणि उंच झाडांखाली थांबणे टाळावे. मोकळ्या जागेत खबरदारी: मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे आणि धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. ‘दामिनी ॲप’ वापरा: वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी मोबाईलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. विश्वास ठेवू नका: कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत. माहितीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी.
नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









