जिल्ह्यात तीन दिवसात सरपंचपदासाठी 79 अर्ज दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या निवडणुकांची धुळवड उडू लागली असून उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. पहिल्या तीन दिवसात सरपंचपदासाठी 79 अर्ज तर सदस्यपदांसाठी 271 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय सत्तांतरामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होतील अशी अटकल बांधली जात असली तरी पहिल्या तीन दिवसात दाखल झालेले अर्ज पाहता ग्रामस्थांचा कल बिनविरोध ग्रामपंचायती करण्यावर असल्याचेही दिसून येत आहे. रत्नागिरी आणि खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचे प्रमाण कमी असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीत 1766 सदस्यांची संख्या असून 686 प्रभाग आहेत. तीन दिवसात फक्त 271 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तर 222 सरपंचपदासाठी आतापयर्र्त 79 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंडणगडमध्ये 14 ग्रामपंचायतीसाठी 4 सरपंच तर 21 सदस्य, दापोली 30 पैकी 16 सरपंच तर 39 सदस्य,खेड 10 पैकी 8 सरपंच तर 29 सदस्य, चिपळूणमध्ये 32 पैकी 8 सरपंच तर 19 सदस्य,  गुहागरमध्ये 21 पैकी 15 सरपंच तर 84 सदस्य, संगमेश्वर 36 पैकी 8 सरपंच तर 17 सदस्य, रत्नागिरीत 4 सरपंच तर 12 सदस्य, लांजात 19 पैकी 11 सरपंच तर 20 सदस्य तर राजापूरमध्ये 31 ग्रामपंचायतीसाठी 8 सरपंच तर 30 सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस बाकी असल्याने या दोन दिवसात अधिक अर्ज दाखल होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.