रत्नागिरी:- आयुर्वेदिक डॉक्टरांना अलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या २१९ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण १ लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी झाले होते. शुक्रवारी सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आल्या होत्या.
रत्नागिरीतील सुमारे ३५० ते ४०० डॉक्टर्स संपात सहभागी झाले असल्याचे माहिती आय.एम.ए.चे रत्नागिरी अध्यक्ष निनाद नाफडे यांनी दिली.
मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेकडून एम. बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील ३६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील १५ हजार वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित रुग्णालायत पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५ हजार ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) सक्रीय सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रीय पाठिंबा दिलेला आहे.फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी (फॉगसी), महाराष्ट्र सा|जकल सोसायटी, फिजिशियन्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन ऑफ पेडीयाट्रिशियन्स, इंडियन डेंटल असोसिएशन, असोसियेशन ऑफ कोलोरेक्टल सर्जन्स, इंडियन रेडीओलॉजीकल अँड इमेजिंग असोसियेशन, फेडरेशन ऑफ फॅमिली फिजिशियन्स ऑफ इंडिया (एफ.एफ.पी.ए.आय.), जीपीए‚ मुंबई, अशा अनेक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतभरातील ६ लाख आयएमए सदस्य त्यात सक्रिय सहभाग झाले होते.तर महाराष्ट्रातील दिड लाख डॉक्टर्स आणि पदवीपूर्व तसेच पदवीपूर्व विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.