जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा वाढता फैलाव; आतापर्यंत आढळले ५८ रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ५८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये डेंग्यूची २७ रुग्ण आढळून आल्याने दापोलीत आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी तपासणी करण्यात येत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाचे पाणी ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये साचल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे डास होऊ नयेत, यासाठी अगोदरच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असते. त्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आलेली असली तरी दापोली. खेडमध्ये डेंग्यूने डोके वर काढले. डेंग्यू संसर्गजन्य रोग असून तो एडिस इजिप्ती डासांपासून होतो. आजूबाजूच्या जिल्ह्यात डेंग्यूचा मोठा प्रसार झालेला असला तरी इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

डेंग्यूचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी घरोघरी फिरून तपासणी करत आहेत. त्याचबरोबर आजारी असलेल्या लोकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.