Friday, May 1, 2026
spot_img
Home राजकीय जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार: आ. जाधव

जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार: आ. जाधव

चिपळूण:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीपैकी ६ ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीने बालेकिल्ला राखला आहे. पण या निवडणुकीत नुकसान पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे झाले असून १५१ नगरसेवकांपैकी त्यांचे फक्त १७ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांना छेडले असता त्यांनी या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले आहे.

यावेळी त्यांनी, कोकणात ठाकरे सेनेला यश मिळाले नाही. ही गोष्ट खरी आहे. कोकणातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आम्हाला फारसे यश मिळाले नाही, हे आम्ही कबूल करतो. पण त्याच बरोबर उभा महाराष्ट्रही हे कबुल करेल की, नाना तऱ्हेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा, त्यांची माणसे विकत घेण्याचा त्यांना धाक दाखवण्यासह दपटशाही करून त्यांचे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर सुद्धा आम्हाला यश मिळाले आहे. भलेही हे यश कमी असेल, पण यश मिळाले आहे. आमचे लोक या प्रचंड दादागिरी समोर, धनशक्ती समोर लढले. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांची पुण्याई कोकणात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेच स्पष्ट होत आहे.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, आता तुम्हीच म्हणाला होतात की अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आमचे नेते घरी जरी बसले होते. तरी सुद्धा आम्हाला एवढे यश मिळले. जर ते बाहेर पडले असते तर किती यश मिळाले असते आणि मग यांची अवस्था काय झाली असती. हे उभा महाराष्ट्रही बघितला असता.

नुकताच आलेल्या निकालानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात यंदा मात्र पूर्ण वाताहत शिवसेनेची झाल्याचे समोर येत आहे. खेड, रत्नागिरी, लांजा, चिपळूण येथे शिंदे शिवसेना, तर गुहागर, देवरूख येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राजापूर नगरपालिका काँग्रेसने काबीज केली आहे. दरम्यान किमान ती रत्नागिरीत होणार नाही अशी अपेक्षा अनेकांना होती. कारण येथे माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव तळ ठोकून होते. मात्र निवडणुकीच्या आधीच येथे मविआत उडालेली ठिणगी, काँग्रेसला डावलले जाणे यासह अंतर्गत वादाची झळ निवडणूक निकालाला बसल्याचे दिसत आहे.

भास्कर जाधव यांनी त्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. तर आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवाराच्या बाजूने रिंगणात उतरले होते. यामुळे मतदारापर्यंत फुटीचा मॅसेज गेला. यामुळे येथे २८ जागांपैकी फक्त ५ जागा शिवसेनेच्या आल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांचाही पराभव झाला. जो भास्कर जाधव यांचा होण्या सारखा आहे.

रत्नागिरी पालिकेत नगरसेवक पदाच्या ३२ जागांपैकी २३ शिवसेना (शिंदे), ६ भाजप आणि ३ उद्धव ठाकरे सेना अशी स्थिती आहे. लांजा नगरपंचायतीत नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ आणि उद्धव ठाकरे सेनेला १ जागा मिळाली आहे. गुहागर नगरपंचायतीत नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये शिवसेना ८, भाजप ५, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १, उद्धव ठाकरे सेना २ आणि मनसेला १ जागा मिळाली आहे. देवरुख नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी विजय मिळवला. नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये भाजप ३, शिवसेना ३, राष्ट्रवादी (अजित पवार) ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेनेने ३ जागा मिळवल्या आहेत.