पहिल्याच दिवशी 416 जणांना लसीकरण
रत्नागिरी:- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियोजनानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सहव्याधी असलेले प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांना करोनावरील लसीकरणाची मोहीम सोमवारी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी 18 विविध केंद्रांवर 416 जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार 45 ते 60 या वयोगटातील रक्तदाब, मधुमेह इत्यादी सहव्याधी असलेले प्रौढ आणि 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारी देशभरात सुरू झाला. या नियोजनानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रूग्णालयासह 3 उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रूग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून एकूण एकूण 18 वैद्यकीय केंद्रांवर या दोन्ही गटांमधील मिळून एकूण 416 नागरिकांना सोमवारी लस टोचण्यात आली आहे. याचबरोबर, रत्नागिरी शहरातील डॉ. लोटलीकर यांचे रामनाथ हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटल, दीनदयाळ रूग्णालय ( लांजा), लाइफ केअर हॉस्पिटल (चिपळूण) आदींसह सहा खासगी रुग्णालयांनाही करोना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. तेथे लवकरच लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 हजाराहून अधिक लोकांनी नोंदणी केली. लसीकरणासाठी येणार्यांची संख्या साडेचौदा हजार आहे.