रत्नागिरी:- जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समितींच्या 112 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून आता पर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी 11 तर पंचायत समित्यांसाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 21 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. 22 जानेवारीला छाननी, 27 जानेवारीला माघार तर 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तीन दिवसात उमेदवाराकडून उमेदवारी दाखल करण्यासाठी थंडा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. तीन दिवसात जिल्हा परिषदेसाठी 11 तर पंचायत समितीसाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मंडणगड, राजापूर आणि लांजा तालुक्यात अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. . दापोलीत जिल्हा परिषद गटासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 5 तर पंचायत समिती गणासाठी 11 अर्ज दाखल झाले आहेत. चिपळूण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती साठी प्रत्येक दोन दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 1 तर पंचायत समितीसाठी 2 आणि रत्नागिरीत जिल्हा परिषदेसाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.









