रत्नागिरी:- ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ४३२ नियोजित योजनांपैकी १ हजार ४२८ योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. त्यापैकी ५९० योजनांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे.
जिल्ह्याची सरासरी प्रगती ४१.३२ टक्के इतकी आहे. यामध्ये लांजा आणि मंडणगड तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. तर गुहागरमध्ये अगदी संथ गतीने काम सुरू आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी लांजा तालुक्याने सर्वाधिक ६४.७५ टक्के कामे पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ मंडणगड (६२.५० टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, गुहागर तालुक्यात केवळ २३.४२ टक्के योजना पूर्ण झाल्या असून, या ठिकाणी कामाची गती वाढवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यात संगमेश्वर, खेड आणि राजापूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक योजना मंजूर आहेत. संगमेश्वर (२०८) आणि खेड (२०५) या तालुक्यांत कामांचा व्याप मोठा आहे. जिल्ह्यात एकूण ३५१ योजना अशा आहेत ज्यांचे काम ७५ टक्के ते १०० टक्के झाले आहे. लवकरच या योजनाही पूर्ण होऊन नागरिकांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ३०३ योजनांचे काम ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, १२४ योजना २५ ते ५० टक्के टप्प्यात आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनांचा नियमित आढावा घेतला जात आहे.
ज्या १५ योजना अद्याप प्रगतीवर आहेत, त्यांना वेग देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मोठी मदत होणार आहे. ४५ योजनांचे काम २५ टक्के झाले आहे. १२४ योजनांचे काम ५० ट्क्के, ३०३ योजनांचे काम ७५ टक्के तर ३५१ योजनांचे काम १०० टक्के झाले आहे.









