जिल्ह्यात चार तालुक्यातील 600 ग्राहक अंधारात

महावितरणने 1700 जणांचे कनेक्शन कापले;
17 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिना संपत आल्याने महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यांत मिळून एकूण २८ कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ११ कोटी वसूल झाले आहेत. उर्वरित १७ कोटींची वसुली पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने थेट वीज कापण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत १७०० ग्राहकांचे कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. यापैकी ६०० ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

वसुलीच्या नावाने महावितरणचे कर्मचारी नियमावली पायदळी तुडवत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नियमानुसार थकबाकी भरण्यासाठी ठराविक मुदत देणे बंधनकारक असताना, राजापूर आणि संगमेश्वरच्या ग्रामीण भागात मुदत संपण्यापूर्वीच वीज कापली जात आहे. इतकेच नव्हे तर, लांजा आणि रत्नागिरीत वीज कापल्यानंतर जुना मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महावितरणच्या दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन एका थकीत बिलासाठी कापले जात असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडे तब्बल ८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, या बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे धाडस अधिकारी दाखवत नसल्याने “नियम फक्त गरिबांसाठीच का?” असा सवाल विचारला जात आहे.

ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ५००० रुपयांवरील बिल ऑनलाइन भरण्याची सक्ती डोकेदुखी ठरत आहे. राजापूर आणि लांजा सारख्या भागात दुपारनंतर बँका बंद होत असल्याने आणि ऑनलाइन पेमेंटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिल भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक कारणांमुळे अनेक कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.

या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आज शनिवार २१ मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत महावितरणचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत पालकमंत्री त्रस्त जनतेला दिलासा देऊन अधिकाऱ्यांना समज देणार की वसुलीच्या मोहिमेचे समर्थन करणार, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.