रत्नागिरी:- मालगुंड येथे महावितरणच्या कार्यालयावर नारळाचे झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. २७) रात्री अचानक सुटलेल्या वेगवान वार्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ‘गुलाब’ वादळाचे पडसाद काही प्रमाणात दिसून येत आहेत.
मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.५० मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ५.८०, दापोली १०.७०, खेड २.६०, गुहागर ९, चिपळूण ६.८०, संगमेश्वर ४.९०, रत्नागिरी १४, लांजा ६.७०, राजापूर १६ मिमी नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३४७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाचशे मिमी अधिक पाऊस झाला आहे.
सोमवारपासून गणपतीपुळे परिसरात पावसासह वेगवान वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होऊ शकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी सोमवारी कोसळल्या. मालगुंड- गणपतीपुळे परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. वेगवान वार्यामुळे मालगुंड येथील महावितरणच्या कार्यालयाजवळील नारळाचे झाड पडले. त्यावरील नारळ कार्यालयाच्या सिमेंट पत्र्यावर पडले होते. त्यामुळे सिमेंटचे पत्रे फुटून गेले असून यामध्ये सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी दिवस कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे हा प्रकार दिवसा घडला असता कदाचित दुखापत झाली असती असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. सुदैवाने रात्री पत्रे फुटल्याने अनर्थ टळला. इमारतीवरील चार पत्रे पूर्णतः फुटले असून एका खोलीचे छत पूर्णतः उघडे पडले आहे. झालेल्या घटनेची महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांकडून मंगळवारी सकाळी करण्यात आली.
ही माहिती मिळाल्यानंतर गणपतीपुळे येथील मदत ग्रुपने मालगुंड घटनास्थळी धाव घेतली. इमारतीवर पडलेले नारळाचे झाड मोकळे करून फुटलेले पत्रे त्यांनी हटवले. तसेच इतर सर्व टाकाऊ कचरा बाजूला करून स्वच्छता केली. मदत ग्रुपने केलेल्या मदतीबद्दल महावितरणच्या अधिकार्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.









