जिल्हाधिकारी मिश्रा; ऑक्टोबर अखेर पर्यंत रुग्णसंख्या वाढण्याचा धोका
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 18 टक्के आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत तो कमी आहे. जिल्ह्यात आता ‘कम्युनिटी स्प्रेड’ (समूह संसर्ग) सुरू आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान आजपासून सुरू झाले आहे. अभियानात सप्टेंबर अखेर 3 हजार 800 तर ऑक्टोबर अखेर 9 हजार बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाधितांचा टक्का 40 टक्क्यावर जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले.
झूम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाखाच्यावर आहे. त्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हचा रेट 18 टक्के आहे. ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत घरोघर जाऊन तपासणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात हा रेट 40 टक्क्यांच्या आसपास पोचण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने त्या अनुषंगाने तयारी केली आहे. प्रत्येक तालुक्यात फीव्हर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. व्हेन्टिलेटर व इतर बेड वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठी कोल्हापूरच्या काही एजन्सींशी चर्चा झाली आहे. जम्बो सिलिंडरबरोर ड्युरा सिलिंडर उपलब्ध करू दिले जाणार आहेत. एका ड्युरा सिलिंडरमध्ये 30 सिलेंडरची क्षमता असते. आरोग्य यंत्रणा व खासगी यंत्रणा सज्ज आहे.
आरोग्य अधिकार्याला कारणे दाखवा रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी गावडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्याला भरपूर काम आहे, अशी उलटसुलट उत्तरे काहींना दिल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनाच्या संसर्गामध्ये अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कारवाई केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली.
लॉकडाउनचा सध्या विचार नाही कोरोनाचा संसर्ग वाढत असताना इतर जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू आहे. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार का? यावर जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात तसा संसर्ग वाढला तर त्याचा विचार होईल. मी काही व्यापारी, व्यावसयिक, विक्रेत्या आदींशी चर्चा केली; मात्र ते तयार नाहीत. शासनाचेही मार्गदर्शन घ्यावे लागेल. त्यामुळे तूर्तास विचार नाही, गरज भासल्यास पाहू.