रत्नागिरी:- कोवॅक्सीन, कोविशिल्ड आणि बारा ते चौदा वयोगटातील मुलांना देण्यात येणारी कॉर्बोवॅक्स या लसींचे साठे उपलब्ध नसल्यामुळे बुस्टर डोस द्यायचा कसा? हा प्रश्न रत्नागिरी आरोग्य विभागासमोर पडला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बुस्टर डोसला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
कोरोनावर लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसी देण्यात येत होत्या. आतापर्यंत 10 लाख 58 हजार 236 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. हे प्रमाण 97.81 टक्के आहे. लसीचा दुसरा डोस 9 लाख 13 हजार 308 जणांना देण्यात आला आहे. हे प्रमाण 84.42 टक्के आहे. त्यामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस 8 लाख 88 हजार 427 आणि दुसरा डोस 7 लाख 63 हजार 800 जणांना देण्यात आला. कोवॅक्सीनचा पहिला डोस 1 लाख 69 हजार 809 आणि दुसरा डोस 1 लाख 49 हजार 508 जणांना देण्यात आला.
बारा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी कॉर्बोवॅक्स या लसीचा पहिला डोस 36 हजार 266 जणांना आणि दुसरा डोस 25 हजार 712 जणांना देण्यात आला. पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीनचा पहिला डोस 53 हजार 631 जणांना तर दुसरा डोस 44 हजार 134 जणांना देण्यात आला.
बुस्टर डोसचे प्रमाण मात्र अतिशय अल्प आहे. बुस्टर डोस 1 लाख 27 हजार 927 जणांना देण्यात आला. त्याचे प्रमाण फक्त 11.83 टक्के आहे. सुरुवातीपासून बुस्टर डोसला अल्प प्रतिसाद होता.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 22 लाख 59 हजार 248 लसीकरण झाले आहे. सध्या आरोग्य विभागाकडे एकाही लसीचा साठा नाही. लसीचा साठा नसल्यामुळे बुस्टर डोस द्यायचा कसा? हा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा बुस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे. दरम्यान बुस्टर डोस घेण्यासाठी नागरीकांमध्येही फारसा उत्साह दिसत नाही.