जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या 251 पैकी 180 जागा रिक्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरीही अद्याप शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी इत्यादी संवर्गातील तब्बल हजारो पदे रिक्त आहेत. यात केंद्रप्रमुखांची 251 पैकी केवळ 71 पदे भरलेली असून, 180 जागा रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्था काहीशी कोलमडल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सुमारे 2464 पेक्षा अधिक शाळा आहेत. 10 ते 12 शाळांवर एक केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील संबंधित शाळांसाठी 251 केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यःस्थितीला संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ 71 केंद्रप्रमुख कार्यरत असून, तब्बल 180 पदे रिक्त असल्याने त्या त्या शाळांना केंद्रप्रमुख नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे शाळांवरील नियंत्रण, तेथील प्रशासकीय समस्या, विविध योजनांची अंमलबजावणी इत्यादीवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, लवकरच केंद्रप्रमुखांची परीक्षा होत आहे. यातून या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे समजते. शिक्षक भरतीबाबत अजूनही कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने या रिक्त जागांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

जिल्ह्यात शिक्षक तसेच अधिकार्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे. सध्या जिल्ह्यात 9 तालुक्यांपैकी एकाच तालुक्याला गटशिक्षणाधिकारी हे पद भरलेले आहे. उर्वरीत 8 तालुक्यांचा पदभार मात्र प्रभारींच्याच हातात आहे. मुळात जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी पदभार हा प्रभारींच्याच हातात आहे.