रत्नागिरी:- पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकर्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते शेतकर्यांकडून 21 लाख 82 हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकर्यांकडून 4 लाख 98 हजार अशी एकूण 26 लाख 80 एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना आर्थिक मदतीचा हात मिळण्यासाठी मार्च 2018 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत वर्षातून तीन टप्प्यात लाभार्थी शेतकर्याला सहा रुपये शासनाकडून देण्यात येतात. त्यासाठी तो भूधारक असावा, ही महत्वाची अट आहे. त्याचबरोबर तो आयकर दाता नसावा, पती-पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल, असे निकष या योजनेसाठी ठेवण्यात आले होते. या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार शेतकर्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी काही शेतकर्यांना दोन वर्षात सहा टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये एवढे पैसेही मिळाले. मात्र, केंद्र सरकारच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या या शेतकर्यांपैकी काही आयकर दाते असल्याचे त्यांनी जोडलेल्या आधार क्रमांकावरून निदर्शनास आले. त्यामुळे अशा शेतकर्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. आयकर दाते तसेच अन्य कारणाने अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे पैसे शासनाकडे जमा करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनी अशा अपात्र शेतकर्यांना नोटीस काढल्या. त्यानुसार जिल्ह्यात 2 हजार 421 शेतकरी आयकरदाते असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकर्यांकडून 21 लाख 82 हजार तर अन्य कारणांनी अपात्र असलेल्या 3 हजार 833 शेतकर्यांकडून 4 लाख 98 हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. अजूनही ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करून घेतली जात आहे.