जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी:- जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सोमवारी रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. यामुळे उष्णतेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंबा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जाहीर केला आहे. साधारण अजून दोन दिवस अशीच स्थिती असणार आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी रात्री मात्र काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडल्या. मंगळवारी सकाळपासूनच उष्णतेमध्ये वाढ झालेली दिसली.

पारा 36 ते 37 अंशावर गेला होता. मंगळवारी सायंकाळी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विशेषतः राजापूर तालुक्यात पाऊस झाला. किनारपट्टीवर 40 कि.मी. ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली? आहे. त्यामुळे जवळपास सर्वच मासेमारी बोटी किनार्‍यावर आल्या आहेत. शेवटी याचा परिणाम मच्छीमारीवर झाला आहे. मच्छीच्या दरांमध्येसुद्धा वाढ होताना दिसत आहे.

चिपळूण परिसरात अवकाळी पाऊस; वीजपुरवठा खंडीत

चिपळूण : वातावरणात वाढलेला उकाडा, त्यामुळे हैराण झालेले लोक.. अशा परिस्थितीत चिपळुणात सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. अर्धा ते पाऊण तास पावसाची रिपरिप सुरू होती. दसपटी, खेर्डी विभागात जोरदार पाऊस झाला. अन्यत्र किरकोळ पाऊस झाला आहे. या पावसामुळे आंबा पिकाला फटक़ा बसणार आहे.

गेले काही दिवस हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. गरमीमुळे नागरिक हैराण झालेले असतानाच शहर परिसरात सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्ते ओलेचिंब झाले तर वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसामुळे महावितरणने काही काळ विद्युत पुरवठा खंडीत केला होता. यामुळे नागरिकांची झोप उडाली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, फणस पिकावर प्रतिकूल परिणाम होणार असून बागायतदार चिंता व्यक्त करीत आहेत.