जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी; रस्त्यांवर शुकशुकाट 

रत्नागिरी:- जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कडक लॉकडॉऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावर पुर्णतः शुकशुकाट असून शहरातील चेकपोस्ट देखील वाढवण्यात आली आहेत. 

 रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हीड-19 रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 20% असून 67% च्या वरती ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत.  त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती विचारात घेता, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून 3 जून ते 9 जून पर्यंत कडकडीत लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यात मेडीकल सेवेव्यतिरीक्त कुणालाही मुभा देण्यात आलेली नाही. तर कृषी विषयक दुकानं केवळ दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा देखील आता बंद करण्यात आल्या आहेत. जर अत्यावश्यक असेल त्यांनाच रत्नागिरीत प्रवेश मिळेल. मात्र, त्यासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट जवळ ठेवावा लागले. अन्यथा कुणाला रत्नागिरीत प्रवेश करता येणार नाही.

रत्नागिरीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा लाँकडाऊन करण्यात आलाय आणि त्याची अंमलबजावणी सुरु झालीय.त्यामुळे रत्नागिरीच्या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेत असलेलीच वाहन दिसत आहेत. तुरळक वाहनांची वर्दळ रत्नागिरीत पहायला मिळते आहे.