रत्नागिरी:- रत्नागिरी विभागात आज तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यामध्ये गुहागरातील एक आणि मंडणगडमधील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या तीन-चार दिवसांत सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत संपातील कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येत होत्या. त्याला कोणतेही उत्तर न देणे, हजर होण्यास सांगितले तरी थातुरमातुर कारणे देणे यामुळे बडतर्फीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या नोटिसांना उत्तरे द्यायलासुद्धा कर्मचारी गेलेले नाहीत. कोणतेही उत्तर न आल्यामुळे शिस्त व आवेदनपद्धतीनुसार प्रशासनाने कारवाईस सुरवात केली आहे. यापूर्वी २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आंदोलनाला ८ जानेवारीला दोन महिने पूर्ण होणार आहेत. तरीही कर्मचारी हजर होण्यास तयार नसल्याने प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. आम्ही दुखवट्यात आहोत त्यामुळे कामावर बोलावू नका, अशी कारणे कर्मचारी देत आहेत. आता बडतर्फीच्या कारवाईमुळे काही कर्मचारी हजर होण्याच्या मनस्थितीत आहेत.
६५९ कर्मचारी हजर
एसटी विभागात आज प्रशासकीय २६९, कार्यशाला १८४, चालक ८४, वाहक ६९, चालक तथा वाहक ५३ असे ६५९ कर्मचारी कामावर हजर होते. तसेच ९७ कर्मचारी अधिकृत रजा, सुट्टीवर होते. २९२३ कर्मचारी कामावर हजर आहेत.
प्रवाशांची संख्या २४ हजारांवर
जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सोडण्यात आलेल्या एसटी फेऱ्यांमधून २४ हजार २२ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये मंडणगड २२३, दापोली ५८२७, खेड १७५८, चिपळूण ४७१५, गुहागर ६३, देवरुख ७६१३, रत्नागिरी ३६७, लांजा ३४५ आणि राजापूर ३१११ प्रवासी. एसटी विभागाला काल ५ लाख ९३ हजार २३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.