रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात आता 100 टक्के एसटी कर्मचारी हजर झाले असून 100 टक्के वाहतूक सुरू व्हायला मात्र अजून काही दिवस लागणार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 75 टक्के वाहतूक सुरू झाल्याची माहिती एस. टी. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
मुळातच शाळा तसेच महा विद्यालयांना सुट्टी पडताना एसटी वाहतूक सुरू झाली. संपानंतर कर्मचारी 100 टक्के हजर झाले असले तरी सगळीकडे पूर्वीप्रमाणे गाड्या न सोडता प्रवासी संख्या पाहून फेर्या सोडल्या जात आहे. जसजसे प्रवासी संख्या वाढेल तशा फेर्या वाढवण्यात येतील, अशी माहिती प्रज्ञेश बोरसे यांनी बोलताना दिली.
दरम्यान, काही ठराविक गाड्यांचे आरटीओ पासिंग होणे बाकी आहे मात्र, यामुळे गाड्यांच्या वेळपत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या सरसकट गाड्या सोडल्या जात नाहीत तर प्रवासी संख्येनुसार गाड्या सोडल्या जात आहेत. आता उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजनही करण्यात येणार आहे. लवकरच ग्रुप बुकिंगला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली.









