जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला; टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता

रत्नागिरी:- फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात तापमानवाढीने कोकण तापले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात किनारपट्टी भागातील पारा सरासरीपेक्षा वरचढ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार कोकणकिनारपट्टी भागात उष्ण लहरींचा विस्तार होणार असून तीन महिन्याच्या कालावधीत कोकणातील जिल्ह्यात तापमान उच्चतम राहणार आहे. त्याची तीव्रता आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागली असून त्याच्या प्रभावाने कोकणात पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.

वाढत्या तापमानाने कोकणातील जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली असून काही भगात विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. माागील पंधरा दिवसांपासून कोकणात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.

कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांतील पाच गावे आणि 16 वाड्यांना नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुुळे नागरिकांना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा लागणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुुळे भूजल पातळीतही वाढ झाली होती. तसेच पाणीटंचाईपासून सुटका झाल्याचे सर्वांना वाटत होते. मात्र, काही ठिकाणी कमी झालेला पाऊस व अधिक पाण्याचा उपसा यामुुळे काही गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहू लागले आहे.
गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात वाड्यावस्त्यांवर वाढू लागली आहे. नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनातर्फे दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी याच कालावधीत रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतील नऊ गावे आणि पाच वाड्यांवर सात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
रत्नागिरीसह रायगडमध्येही तापमानात वेगाने वाढ होत असून पाण्याची चणचण या जिल्ह्यातही भेडसावू लागली आहे. त्यामुळे या भागातील काही गावांनी आता टँकरची मागणी केली आहे. दिवसा उन्हाच्या झळा वाढल्या असून रात्री गारठा पडत आहेत. त्यामुळे आजारपणही वाढत आहे.