रत्नागिरी:- एप्रिल, मे महिन्यात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. रेल्वे, बस आणि ट्रॅव्हल्सने हे चाकरमानी परतीच्या प्रवासाकडे लागले आहेत.
यावर्षी सर्वत्र वाढता उष्मा असल्याने पर्यटकांसह चाकरमान्यांची विसाव्यासाठी कोकणाकडे पावले वळली. महिनाभर आपल्या गावाकडे राहण्याचा आनंद घेतल्यावर आता मुलांच्या शाळा, कॉलजेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने, तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग असल्याने परतीच्या प्रवासासाठी झुंबड उडत आहे. पहाटे सुटणारी दिवा पॅसेंजर असेल वा इतर मध्य रेल्वेच्या गाड्या सर्व हाऊसफुल्ल धावत आहेत. एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण 2 महिने आधी करूनही 100 ते अगदी 300 पर्यंत तिकीट वेटिंग दाखवत आहेत. आता महिलांना एसटीत हाफ तिकीट असल्याने एसटीच्या सर्व गाड्याही फुल्ल असतात. जे चाकरमानी खासगी वाहनांनी दाखल झाले आहेत, त्यांना आता महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, महामार्गाचे काम सुरू असल्याने जागोजागी साहित्य आणि खड्डे या दोन्ही गोष्टींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत असले तरी प्रवाशांनी हळूहळू आपल्या कामाचा ठिकाणचा रस्ता धरायला लागले आहेत. रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावल्या जात आहेत. त्यातूनही नंबर लावण्यावरून वाद सुद्दा होत आहेत. सकाळी 11 वाजता तत्काळचे तिकीट द्यायला सुरू होते, मात्र पहाटेपासून रांग लागत असल्याने अक्षरशः याठिकाणी झुंबड उडाल्याचे दृश्य गेले आठवडाभर दिसून येत आहे.